टॅक्सी

माणूस कित्येकदा विनाकारण तडजोड करत बसतो. मान्य आहे, तडजोड भाग आहे आयुष्याचा! काही जण म्हणतील तडजोड ही यशस्वी आयुष्याची गुरूकिल्लीच आहे.आहे त्यात आनंद बघावा आणि जे नाही पटत त्याच्याशी जुळवून घ्यावं. हो, घ्यावं जुळवून, पण किती?? एकदा तरी ह्या तडजोडीला बगल द्यावीच.. देऊनच पहावी.. जर ही तडजोड जीवनावश्यक नसेल तर एकदा तरी त्या व्यतिरिक्त वेगळा विचार करुनच पहावा.
बरेचदा खूप काही मिसिंग असतं, त्याशिवाय आपण बेचैन असतो. ते मिळवणं कठीण आहे, अगदी अशक्यच! असा विचार करून ते मिळवण्याचा विचारच करत नाही. एकही पाऊल त्यादिशेने उचलत नाही. झुरतो आणि झुरत बसतो… पण वरवर निवांत चाललेल्या आयुष्यात अनेक असे क्षण येतात, जेंव्हा आपण बेचैन होतो, ढवळून निघतं सगळं, श्वास कोंडतो, पश्चाताप होतो घेतलेल्या किंवा न घेतलेल्या एखाद्या निर्णयाबद्दल!
नातं, नौकरी, शिक्षण, घर, वजन, मुलं काहीही, कश्याही बाबतीत हे होऊ शकतं आणि मग आपण काही काळ दोषारोपांचा खेळ खेळत बसतो. काही लोक दुसर्‍यांना दोष देतात काही स्वतःला, नाहीच काही सापडलं तर नशीब आहेच तुमचे दोष झेलायला.
पण जर एकदा असाही विचार केला की ह्या परिस्थीतीबद्दल आत्ता ह्या क्षणी मी काही करू शकतो का? बदलता येणार आहे का ही परिस्थीती? नाही ना? मग पुन्हा का त्यावर मी वेळ दवडू माझा? बाकी जे आहे त्यात आनंद मानून पुढे जाऊ.(हाच विचार आपण जास्त करतो.) पण ह्या नंतर पुन्हा कधी हा विचार यायला नको डोक्यात, पुन्हा पश्चाताप नको वाटायला. आहे ते स्वीकारून पुढे जाणं हा एकच मार्ग असेल तर झालं मग.. स्वीकारायचं आणि पुढे जायचं.
किंवा एकदा असाही विचार करू शकतो ना की
काय करू शकतो आत्ता ह्या क्षणी? कशी बदलायची परिस्थीती? हा मार्ग आहे का? मग करून पाहायचं का? चला एक चान्स घेऊनच पाहू!! फार फार तर काय होईल. अपयश येईल. पुन्हा येरे माझ्या मागल्या! त्या आधीही जगत होतोच ना बरं आयुष्य. पण प्रयत्न केल्याचं समाधान तर मिळेल.
पण ही रिस्क घेतली, हा चान्स घेतला तर समाधानही मिळेल, कदाचित जे हवंय, ज्याकरता ही तगमग आहे ते ही मिळेल. फक्त एकदा हिम्मत करून बघायला हवी!! फक्त एकदा कंफर्टे झोनच्या बाहेर पडायला हवं. जग काय म्हणेल हा विचार सोडून, चाकोरीबद्ध आयुष्य मोडून एकदा, फक्त एकदा आपली तगमग शांत करण्याकरता प्रयत्न करायला हवे.
पण आपण; लोग क्या कहेंगे, मी असं का नाही केलं, तुमच्या मुळे, ह्यांच्या मुळे, त्यांच्या मुळे, मला हे नाही करता आलं ते नाही करता आलं, माझंच चुकलं, असं होत नसतं, आता वेळ गेली, आता ते शक्य नाही; ह्या अश्या तमाम सबबींचे गुलाम झालेले असतो. आणि पुन्हा ‘मी आहे त्यात कसा सुखी आणि समाधानी आहे’ ह्या अविर्भावात एक खोटा मुखवटा चढवून जगत बसतो… जगतो का खरंच? माहित नाही..
सगळ्याच तडजोडी चुकीच्या नसतात, पण सगळीकडेच तडजोड करणं चुकतं! काही वर्षांनंतर पुन्हा त्या विषयाबद्दल आपण असेच व्याकूळ होऊ, असाच श्वास कोंडेल, तेंव्हा पुन्हा एकदा; काश…, परिस्थिती, लोकं, नातेवाईक, काही नाही सापडलं तर नशिब आणि मग एक सुस्कारा आणि  पुन्हा मुखवटा!
पण हे कळायला हवं की प्रयत्न कधीही करता येतील, श्वास सुरू आहे तोपर्यंत कधीही आपल्या स्वप्नपूर्ती साठी पावलं उचलताच येतील. बस… वो गेट के सामने खडी टॅक्सी पडकने की देर है!

error: Content is protected !!