सामाजिक
कन्या दिवस

कन्या दिवस

काल कन्या दिवस झाला! मुली खरोखरच घराला घरपण देतात, हे एका मुलीची मोठी बहीण, हो मुलीचीच आणि आता आई झाल्यावर कळलं.
मी सहावीत असताना, माझ्या सगळ्यात लहान बहिणीचा (आधी सांगितल्याप्रमाणेच आमच्यात ते कझिन बिझिन नसतं, ते जगासाठी) जन्म झाला आणि आपसूकच माझ्यात तिच्यासाठी मोठ्या बहिणीच्या भावना जागृत झाल्या. तिच्या सोबत मी वेळही सगळ्यात जास्त घालवला, त्यामुळेच की काय आमचं सूत्र चांगलंच जुळलं. जस जस वय वाढत गेलं ती बहीण कमी आणि लेकच जास्त वाटू लागली. तिच्या प्रत्येक गोष्टीच कौतूक कराताना मी थकत नव्हते. ती आली की तिला मी सतत माझ्या जवळ ठेवायचे, मावशी म्हणायची देखील, अग तू नसली की कोण घेणार जवळ तिला सारखं?? नको सवय लावू.. (ते का म्हणायची, हे आत्ता मला कळतंय) पण मला ती जवळच हवी असायची. तिला शाळेत परफॉर्म करतांना पाहून डोळ्यांत तळ साचायचंच, मन भरून यायचं इतकं कौतुक. ती आहेच तशी सगळं सांभाळून घेणारी, लाघवी, आत्मविश्वासाने भरलेली.
मग जेंव्हा खरोखर आई व्हायची वेळ आली, तिचा फोटो समोर ठेवूनच नऊ महिने काढले पण झाला पोरगा!!
पण दुसर्‍यांदा तरी मुलगी व्हावी अशी मनापासून प्रार्थना कदाचित तिनेही केली असेल आणि मी तर केलीच होती! आणि आज तेच चैतन्य आमच्या घरात नांदतंय जे तेंव्हा आमच्या मधुलिका मुळे नांदायचं.
पण ह्या सगळ्या प्रवासात एक गोष्ट मात्र लक्षात आली. ह्या चैतन्याला विश्वासाची जोड असणं अत्यंत आवश्यक आहे. ती नुसतं मुलगी किंवा स्त्री किंवा कुणाची आई, सून ह्याच भुमिकांकरता नाही तर आत्मनिर्भर सुद्धा बनवायला हवं. मुलीचा जन्म झाला म्हणून त्या दिवसापासून तिला लग्नाकरता किंवा एका उत्तम गृहिणीच्या रोल मधेच का बघायचं?? बरं बघितलं आणि घडवली उत्तम गृहिणी, तरीही तिला आत्मविश्वास द्यायलाच हवा, तिला बाहेरच्या जगातही वावरता यायला हवं, तिच्यावर अन्याय होत असेल तर तिला त्याच्या विरुद्ध आवाज उठवायलाही शिकवायलाच हवं. लोक काय म्हणतील ह्या विचाराला उडवून लावायलाही शिकवायला हवं.
बरेचदा मुलींचे प्रश्न असतात, लग्नानंतर माझं घर कोणतं?? जिथे राहते ते सासर, जिथे जाते माहेर आणि मग तिचा मात्र हक्क कश्यावरच राहत नाही. परके पणा दोन्हीकडे असतोच. मग अशावेळी ती हतबल होते कधी कधी. अशी असाय्य पिढी तयार करण्यापेक्षा आणि अशी उपेक्षा आपल्या मुलीला सहन करायला लावण्यापेक्षा तिला तिच हक्काचं स्थान मिळवता यायला हवं ह्याकरता तयार करा.
मी अगदी बावीस वर्षांची होत पर्यंत मला बँकींग मधलं काही करावं लागत नव्हतं. आधी मी म्हणायचे मी सुरक्षीत वातावरणात वाढली आहे. पण नाही, माझ्या दिमतीला सतत कुणीतरी असायचं आणि मी त्या बाबतीत पांगळी बनत गेले. पण बाहेर पडल्यावर मात्र मलाच माझं करावं लागलं.
फर्स्ट ईयरला असतांना एका दुसर्‍या कालेजच्या मुलाने सिग्नेचर डे ला सही मागितली, मी गोंधळले. काय करावं सुचलं नाही. माझ्या जवळच्या मित्रांनी ती परिस्थिती हाताळली आणि मी पांगळी होत गेले. मला उत्तर देता यायला हवं होतं, पण मी तयार नव्हते. पुढेही कुणासमोर आपली बाजू मांडायचं सामर्थ्य माझ्यात नव्हतंच. ते फार उशीरा आलं. पण तो पर्यंत बराच काळ गेला होता निघून. देर आए दुरूस्त आए, ह्याला इथे अर्थ नसतो. वेळ गेली की पुन्हा येत नाहीच. 
त्यामुळे जेंव्हा ज्या गोष्टीकरता मुलगी तयार असायला हवी ती वेळ जपणं महत्वाचं आहे. तिला कुबड्या देणं, तिच्या कुबड्या बनणं बंद करायला हवं. तिनेही कुबड्या घ्यायला नकोतच. तडजोड स्वतःच्या आत्मसन्मानापेक्षा मोठी नसावी हे ही तिला कळणं अत्यंत आवश्यक आहे. (कुणी शिकवण्यापेक्षाही तिने हे शिकणं आवश्यक आहे.) आपण कुठे थांबयचं, कुठली वाट निवडायची हे सगळं तिला जमायलाच हवं.
बाहेरचं जग ओळखायला आणि त्याच्याशी दोन हात करायला शिकता यायला हवं. त्यासाठी एकदा तरी एकट्याने बाहेर पडावं, धडपडावं आणि खूप काही शिकावं.
अशी एक पिढी, आत्मविश्वासाने भरलेली, मन मोकळं करून हवं ते घेऊन नको ते सोडू शकणारी, सर्वसमावेशक तरी आपली एक स्पेस जपणारी, अशी नवीन पिढी तयार करणं अत्यंत आवश्यक आहे. तिला जपा पण तिला स्वतःला कसं जपायचं ते सुध्दा शिकवा. मातीच्या गोळ्यापासून माठ तयार केला अन् त्याला भट्टीच नाही दाखवली तर?? दाखवा भट्टी, जळू द्या, सोसू द्या पण स्वतः, स्वतःला सावरण्याची ताकद मिळू द्या.
उद्या हिच तुमची लेक, हिच नवी पिढी एक स्वतंत्र व्यक्तिमत्त्व बनून ताठ मानेने जगू शकेल. आणि मग होईल खऱ्या अर्थाने डाॅटरस् डे साजरा!

– मानसी सगदेव मोहरील

चित्र – गुरू ठाकूर

error: Content is protected !!