मराठी कविता
सय

सय

धुकं लागते तरळू
जसे रानात वनात
तशी सय तुझी दाटे
खोल खोल हृदयात


दिसे अंधूक अंधूक
जसे सारे ह्या धुक्यात
मीही होत जाते धुंद
तुझी आठव मनात


धुके जाईल वाहून
आता पुढच्या क्षणाला
तू ही रुजशील ना रे
वेड लावून जीवाला


तुझा वास आहे खोल
आत मनाच्या तळाशी
जसे हरवते धूके
खोल झाडांच्या मुळाशी


धुके बरसते पुन्हा
सर होऊन सावळी
तू ही भिजवून जातो
लाज डोळ्यात काजळी


होते चिंब चिंब धरा
पुन्हा पांघरुन धुके
तुझ्या एका सयीपुढे
माझे सारे जग फिके

मानसी

error: Content is protected !!