मराठी लेख
This pain is going to be everlasting!

This pain is going to be everlasting!

आम्ही त्या पिढीतले आहोत ज्यांच्या playlist मध्ये श्रेया, अरिजीत असले तरी आम्ही शिद्दत से ‘आशा-रफी’ ऐकतो. एखादी शांत, आकाशात गुलाबी-केशरी रंग घेऊन उतरलेली संध्याकाळ आम्हाला आजही ‘अभी ना जाओ छोड़कर’ ऐकत घालवायला आवडते. एखाद्या पार्टीमध्ये आजही ‘ये मेरा दिल’ सुरू झालं की आमच्यातली हेलन जागी होते. कुणाची लडीवाळपणे समजूत काढताना आजही ‘अच्छा जी मैं हारी’ मदतीला येतं आणि ‘रात शबनमी’चा रंग तर काही औरच! 

आशा भोसले आपल्या सगळ्या moods वरचं एकुलतं एक solution आहे, असं पक्कं मनात ठासून भरलेली आमची पिढी आज खऱ्या अर्थाने पोरकी झालीये. हो, अतिशयोक्ती नाहीये ही! ‘आपल्या प्रत्येक क्षणाकरता आशाबाई आहेतच’ हे गृहीत धरून जगतानाच, त्या गेल्याची बातमी येते आणि मनात विचार येतो की आता त्या मिश्किल, हसर्‍या, केसात एक मोठ्ठं फूल माळलेल्या आशाबाई आपल्याला दिसणार नाहीत. आपण साधारण रसिक काही त्यांना रोज बघत नसतोच; पण आशाबाई आहेत, कुठल्यातरी कार्यक्रमात त्या दिसतील, हसताना, बोलताना त्यांना बघता येईल ही आशाही आता मावळली आहे.

त्या का इतक्या लोकप्रिय झाल्या याचा विचार कधी केला तर लक्षात येतं की त्यांनी कधीही वयाचं, काळाचं बंधन स्वतःला घालून घेतलं नाही. त्यांनी अनेक भाषांमधे गाणी तर गायलीच, पण प्रत्येक वयाच्या, प्रत्येक गायनप्रकार गाणाऱ्या गायकांसोबत आणि संगीतकारांसोबतही काम केलं — अगदी ब्रेट ली सोबतही! त्यात आपण मराठी लोकं अधिक भाग्यवान! त्यांच्या मराठी गाण्याचाही खजिना आपल्याकडे आहे.

त्यांची काही गाणी नवोदितांसाठी गायला तशी सोपी होती, त्यामुळे कदाचित प्रत्येकालाच ती जवळची वाटतात, अगदी आजही. त्यांच्या गाण्यांचे अल्बम आजही सगळ्यांच्या आवडीचे आहेत. खरंतर, त्यांचा वावर संगीत क्षेत्रात सगळीकडेच होता.

त्या फक्त एक गायिकाच नाही तर स्टाइल आयकॉन होत्या.  

कसं जमलं असेल ना हे सगळंच? सगळ्याच पद्धतीची गाणी, सगळे रंग कसे उतरवता आले असतील संगीताच्या कॅनव्हासवर? हे असं व्यक्तिमत्त्व एखादंच जन्माला येतं. त्यामागची त्यांची मेहनतही अफाटच होती म्हणा. एखाद्या वृक्षाच्या छायेखाली वाढणाऱ्या झाडाचा वृक्ष होणं कठीण असतं, हे आशाबाईंच्या बाबतीत नेहमीच ऐकत आलोय आपण सगळे. पण तो वृक्ष होताना त्या रोपट्याला करावी लागणारी धडपड कधीही दुर्लक्षित राहिली नाही, याचा आनंद वाटतो. त्यांच्या गाण्यावर, त्यांच्या आवाजावर जितकं जगाने प्रेम केलं तितकंच प्रेम त्यांच्या या धडपडीवरसुद्धा केलंय. म्हणूनच कदाचित 1943 पासून ते अगदी आत्ता-आत्तापर्यंत आलेल्या सगळ्या गाण्यांना रसिकांनी भरभरून प्रेम दिलंय. अगदी मागच्याच महिन्यात कुठल्याशा कार्यक्रमाचा व्हिडिओ बघितला, त्यांना गाताना ऐकलं आणि वाटून गेलं की हा सूर कायम असाच राहू देत.

मागेही एकदा लिहिलं होतं, की एखादं माणूस कायम असणारच आहे हे गृहीत धरलेले आपण अशा काही बातम्यांमुळे अस्वस्थ होतो. आणि मग लक्षात येतं यांनाही नाहीच मिळालंय अमरत्वाचं वरदान! पण अशा या विभूतीचा आवाज तरी अमर झालेला आहे, तेवढंच काय ते सुख! उणीव भासत राहील कायमच!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!